पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. १६ मे रोजी वैष्णवीने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असून, राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय व्यक्तींबरोबरच कलाकारांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अभिनेता हेमंत ढोमे, पुष्कर जोग, प्रवीण तरडे यांच्यानंतर अभिनेत्री अश्विनी महांगडेने देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत अश्विनीने आपला संताप व्यक्त केला आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी तिने केली आहे. 'शिकलेल्या आणि श्रीमंत घरातील माणसे सुनेला मारहाण करून माहेरहून काहीतरी आणायला सांगतात, ही अत्यंत क्रूर मानसिकता आहे. आरोपींना योग्य शिक्षा व्हायलाच हवी. जर हे प्रकरण दाबले गेले, तर पुन्हा एकदा पैसा आणि पदाचा विजय होईल आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे यावर वेळीच वचक बसणे गरजेचे आहे,' असे अश्विनी महांगडे म्हणाली आहे.
अश्विनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टॅग करत या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत, ज्यामुळे समाजात तीव्र संताप आहे.