भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र राज्यात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ह्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने २२ ते २४ मे दरम्यान कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि परिसरात २३ मे रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी वाढू शकते. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई महानगर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आज, २३ मे रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात २६ वर्षानंतर मे महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. धाराशिव जिल्ह्यातील ७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.