अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे. २१ मे रोजी सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे थांबवण्यात आली होती. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया सोमवार, २६ मे रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा सुरू होईल. तसेच, प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या सॉफ्टवेअर कंपनीला ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं, त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. आता ही समस्या दूर करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.
दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मुकुंदराव आंधळकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागात बहुतेक विद्यार्थी गावातच अकरावीला प्रवेश घेतात आणि १५ जूनपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयं सुरू होतात. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अडचणींमुळे गैरसोय टाळण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, २६ मे ते ३ जून या कालावधीत अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल. ५ जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल, तर ६ ते ७ जून या दरम्यान हरकती व निराकरण केले जाईल. ९ जून ते ११ जून दरम्यान प्रवेश निश्चिती केली जाईल आणि ११ ते १८ जून या काळात माध्यमिक विद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे.