कल्याण पूर्वेकडील चिकणी पाड्यात सप्तशृंगी इमारत दुर्घटनेमुळे बेघर झालेल्या नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे (KDMC) धाव घेतली आहे. गुरुवारी पालिका प्रशासनाला भेटून त्यांनी तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केली. दुर्घटनेतील पीडितांनी पालिका प्रशासनाकडे आपली व्यथा मांडताना, 'आमचा संसार उध्वस्त झाला असून, तो पुन्हा उभा करण्यासाठी प्रशासनाने मदत करावी,' अशी आर्त विनंती केली.
या दुर्घटनेत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. इमारतीमधील सुमारे ५० कुटुंबांचे होत्याचे नव्हते झाले. सध्या या बेघर नागरिकांसाठी नूतन विद्यामंदिर शाळेत तात्पुरती निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, शाळा लवकरच सुरु होणार असल्याने त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारत दुर्घटनेतील एक रहिवासी आणि इमारतीच्या सेक्रेटरी रेखा पाठारे म्हणाल्या, 'आम्ही इथे मोर्चा काढण्यासाठी नाही, तर पालिकेला निवेदन देण्यासाठी आलो आहोत. तात्पुरती सोय म्हणून शाळेत आसरा मिळाला आहे, परंतु शाळा सुरु झाल्यावर आम्ही कुठे जायचे?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पाठारे यांनी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबतही आपले मत व्यक्त केले. ' सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे, ती लवकरात लवकर मिळावी. तसेच, दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च सरकारने करावा,' अशी मागणी त्यांनी केली. पालिका आयुक्त अभिनव गोयल हे शहर बाहेर असल्याने, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी नागरिकांची भेट घेतली आणि आयुक्तांसोबत शुक्रवारी दुपारी १ वाजता बैठक निश्चित केली. आपल्या भावना व्यक्त करताना पाठारे यांना अश्रू अनावर झाले. ' अनेक वर्षांपासून जमवलेला संसार १५ मिनिटांत कसा बाहेर काढायचा? ', असा सवाल त्यांनी केला.