मुंबई: महाराष्ट्रात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. विशेषत: गेल्या पाच वर्षांपासून राज्यात हाताच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे होत आहेत. आतापर्यंत १५ दात्यांनी आपले हात दान केले आहेत, ज्यामुळे २६ गरजू रुग्णांना नविन जीवन मिळाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या १५ पैकी १३ दाते हे परराज्यातील आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रातही हात दानाबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे, असे मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या सात रुग्ण प्रतीक्षेत आहेत.
राज्यात पहिली हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया २७ ऑगस्ट २०२० रोजी मोनिका मोरे या तरुणीवर झाली. त्यानंतर, एकूण १५ शस्त्रक्रिया पार पडल्या. यापैकी २ केईएम रुग्णालयात, तर १३ शस्त्रक्रिया परळच्या ग्लेनेगल रुग्णालयात झाल्या. केईएम रुग्णालयात दोन रुग्णांवर प्रत्येकी एका हाताचे प्रत्यारोपण झाले, तर ग्लेनेगल रुग्णालयात ११ रुग्णांवर प्रत्येकी दोन हातांचे आणि २ रुग्णांवर प्रत्येकी एका हाताचे प्रत्यारोपण करण्यात आले.
स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (सोटो) च्या माहितीनुसार, अवयव दान करण्याचा निर्णय दात्याच्या नातेवाईकांचा असतो. त्यांचे समुपदेशन केले जाते, परंतु त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती केली जात नाही. ग्लेनेगल रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. निलेश सातभाई यांनी सांगितले की, त्यांच्या रुग्णालयात हात प्रत्यारोपण झालेल्या शस्त्रक्रिया केलेले सर्व रुग्ण सुखरूप आहेत. राज्यात इतर अवयव दानाबद्दल जनजागृती असली तरी, हात दानाबद्दल जागरूकता कमी आहे. त्यामुळे, नागरिकांनी याबद्दल अधिक जागरूक असणे आवश्यक आहे.