आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ४५-५० वयोगटातील पिढीने १८ ते २० वर्षांचे असताना मोबाईल फोनचा अनुभव घेतला. त्यावेळी इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल्ससाठी जास्त पैसे लागत असल्यामुळे, तो सर्वांसाठी परवडणारा नव्हता. दूरसंचार क्षेत्रात झालेल्या विकासामुळे मोबाईल प्रत्येकाच्या हातात पोहोचला, पण लोकांची नंबर लक्षात ठेवण्याची क्षमता कमी झाली, कारण नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करण्याची सोय झाली.
आज एआयमुळे वेळ आणि श्रमाची बचत होत असली, तरी विद्यार्थ्यांच्या हातात ते सोपवणे चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांच्या मनाचा आणि भावनांचा विकास होण्याच्या काळात, एआय त्यांना रेडीमेड माहिती पुरवते. या माहितीमध्ये पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असण्याची शक्यता असते, ज्यामुळे तेच सत्य आहे असे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसू शकते. यामुळे त्यांच्यातील क्षमता विकसित होण्यास वाव मिळत नाही. मेंदूला चालना देण्याऐवजी, ते तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याची शक्यता वाढते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलांना हवी असलेली माहिती तंत्रज्ञान पुरवते, पण त्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे, शालेय शिक्षण धोरणांमध्ये तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा यावर विचार करणे आवश्यक आहे. मानसोपचारतज्ज्ञ नर्मदा राधेश्वर यांच्या मते, 'ज्याच्या त्याच्या मेंदू एवढा विश्वाचा आकार असतो', त्यामुळे अमर्याद मेंदूला तंत्रज्ञानाचे कुंपण घालणे कितपत योग्य आहे, यावर विचार करायला हवा, असे तंत्रज्ञान विश्लेषक रवी प्रधान यांनी सांगितले.