जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारताने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारत जगातील पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. निती आयोगाच्या अध्यक्षांनी याबाबत माहिती दिली आहे. भारताने जपानला मागे टाकून हे यश मिळवले आहे. जागतिक स्तरावर मंदीचे सावट आणि व्यापार युद्धासारख्या परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्थेने केलेली ही प्रगती महत्त्वपूर्ण आहे.
निती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने जपानला अधिकृतपणे मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे. निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. "आज आपण ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलो आहोत. भारत आता जपानपेक्षा मोठा आहे. आपल्या पुढे आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे देश आहेत. योग्य नियोजन आणि विचारपूर्वक धोरणे यांचा अवलंब केल्यास येत्या अडीच ते तीन वर्षांत आपण तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकतो," असा विश्वास सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केला.
सुब्रह्मण्यम यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या आकडेवारीचा हवाला दिला. अमेरिका शुल्क आकारणीच्या धोरणांवर भाष्य करताना ते म्हणाले, "अमेरिका कंपन्यांसाठी उत्पादन खर्चाच्या दृष्टीने भारत स्वस्त पर्याय ठरू शकतो." मालमत्ता मुद्रीकरण पाइपलाइनचा दुसरा टप्पा तयार असून लवकरच त्याची घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे ४००० अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ४,००,००० कोटी रुपये इतकी मोठी रक्कम होते.