भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे राज्य आणि देशाला मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सून नेहमीच्या वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. सध्या, मान्सूनने केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांना वेढले असून या तिन्ही राज्यांमध्ये २५ मे रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागांमध्ये पुढील सात दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून पुढील दोन दिवसात तो महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई, उपनगर आणि ठाण्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज सकाळपासूनच मुंबईत आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि जोरदार पाऊस सुरू झाला. त्याचप्रमाणे, ठाण्यातही पावसाने हजेरी लावली आहे.
आज (दि. २५ मे) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, ज्यामुळे या सात जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ८५ तालुक्यांतील २२ हजार २३३ हेक्टर क्षेत्रावरील मका, ज्वारी, भाजीपाला, संत्रा, भात, आंबा आणि इतर फळपिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.