बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अवघ्या नऊ महिन्यांतच पानसरे यांची बदली का करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
विश्व पानसरे यांनी बुलढाण्यात अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. अनेक अवैध धंदे त्यांनी बंद पाडले. त्यामुळे जिल्ह्यातील काही राजकीय नेते नाराज होते, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे. याच नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे पानसरे यांच्याबद्दल तक्रार केली आणि त्यानंतर त्यांची बदली झाली, असा दावाही त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे पुन्हा सुरू करण्यासाठीच ही बदली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, न्यायालयाने बदलीला स्थगिती दिल्याने फडणवीस सरकारला चपराक बसल्याचे सपकाळ म्हणाले.
दरम्यान, विश्व पानसरे यांच्या बदलीला आव्हान देत 'कॅट'मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना बदलीला स्थगिती दिली आहे. मात्र, तत्पूर्वीच निलेश तांबे यांनी बुलढाण्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे आता बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकरणात आता न्यायालय काय निर्णय देते, याकडे लक्ष लागलेले आहे.