मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीदरम्यान, त्याने टी20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण खेळ करत त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सूर्यकुमार यादवने टी20 क्रिकेटमध्ये सलग 13 सामन्यांमध्ये 25 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम टेम्बा बवुमाच्या नावावर होता, ज्याने 2019-2020 मध्ये सलग 13 सामन्यांमध्ये 25+ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने एका वर्षात ही कामगिरी करत विशेष विक्रम नोंदवला आहे. या खेळीमुळे सूर्यकुमार यादव आता टेम्बा बवुमाच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या बरोबरीला पोहोचला आहे.
आता सूर्यकुमार यादवची नजर टेम्बा बवुमाचा विक्रम मोडण्यावर आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या पुढील सामन्यात त्याला वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. सध्याच्या फॉर्मनुसार, सूर्यकुमार यादव हा विक्रम सहज मोडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत.