पुण्यातील शंतनू कुकडे याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाशी संबंधित तपासात आर्थिक गैरव्यवहाराचे नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. पोलिस तपासात कुकडेच्या बँक खात्यात 100 कोटी रुपयांहून अधिक रक्कम आढळून आली असून, त्यातील सुमारे 40 ते 50 कोटी रुपये इतर व्यक्तींच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी यासंदर्भात आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ED) पत्र पाठवले असून कुकडेच्या खात्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे.
या प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे नावही चर्चेत आले आहे. कुकडेच्या निकटवर्तीय सीए रौनक जैन यांच्या खात्यातून मानकर पिता-पुत्राच्या खात्यावर पावणेदोन कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मानकर यांनी या आरोपांचा निषेध करत हे व्यवहार एका कायदेशीर जमीन व्यवहाराशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचा कुकडेच्या वैयक्तिक व आर्थिक व्यवहारांशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
तपासात हेही समोर आले आहे की, काही महिलांच्या खात्यांवर पाच ते साडेसात लाख रुपयांची रक्कम कुकडेकडून पाठवण्यात आली होती. त्यामुळे कुकडे शहरासह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर रॅकेट चालवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा कलमही या गुन्ह्यात समाविष्ट केला आहे.