सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपटगृहांमध्ये अपेक्षित यश मिळवू शकला नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ए. आर. मुरुगदॉस दिग्दर्शित हा चित्रपट २५ मे २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
'सिकंदर' चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये होते. चित्रपटाने थिएटरमध्ये फारशी कमाई न केल्यामुळे निर्मात्यांनी ओटीटी आणि म्युझिक राइट्सच्या माध्यमातून तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. ओटीटीसाठी या चित्रपटाने जवळपास ८५ कोटींचा करार केला असल्याची माहिती आहे. या चित्रपटात सलमान खान सोबत रश्मिका मंदान्ना, सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, जतिन सरना, संजय कपूर, नवाब शाह आणि अंजिनी धवन यांच्या भूमिका आहेत.
'सिकंदर'नंतर सलमान खान लवकरच सत्य घटनेवर आधारित गलवान व्हॅली संघर्षावर आधारित चित्रपटात दिसणार आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे, परंतु सलमान लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.