पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा 'पुणे पॅटर्न' चर्चेत आला आहे. 2007 मध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजित पवार यांनी भाजप व शिवसेनेच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले यांची महापौर म्हणून निवड झाली होती. त्याकाळी स्थायी समितीचे अध्यक्षपद भाजपकडे, उपमहापौरपद शिवसेनेकडे देण्यात आले होते. हा राजकीय प्रयोग त्या वेळच्या राज्य आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचा ठरला होता.
सध्या राज्यात अजित पवारांचा गट शिंदेसेना व भाजपसोबत सत्तेत असून, हेच समीकरण महापालिकेतदेखील राबवले जाऊ शकते. प्रशासक राजाखाली असलेल्या पुणे महापालिकेत भाजप स्वतंत्रपणे लढेल की तीन पक्षांचा युती 'पुणे पॅटर्न' म्हणून समोर येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीही सक्रिय असून काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत निवडणुकीस सामोरे जाण्याची शक्यता आहे.
राज्य राजकारणातील दोन मोठ्या फूटीनंतर राजकीय स्थैर्य डळमळलेले असताना पुणे महापालिकेची निवडणूक अधिकच महत्त्वाची ठरणार आहे. पुणे पॅटर्न विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ रेषेत निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात कोणते गट स्थानिक मतदारांवर प्रभाव टाकतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल.