पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत युद्धजन्य परिस्थितीत काय करायचे याचे मॉक ड्रील (रंगीत तालीम) घेण्यात आले. यामध्ये विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी एकत्र येऊन यशस्वी समन्वय साधला. या मॉक ड्रीलमध्ये नागरी सरंक्षण दल, अग्निशमन दल, पोलीस विभाग, वैद्यकीय अधिकारी, मनपा सुरक्षा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सहभागी झाले होते.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मॉक ड्रीलसंबंधी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपत्ती परिस्थितीत योग्य काळजी कशी घ्यावी आणि सर्व यंत्रणांना कसे सहकार्य करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. या मॉक ड्रीलमध्ये एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते, तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
हा मॉक ड्रील पुणे महापालिका आणि संबंधित यंत्रणांसाठी एक महत्त्वाचा अनुभव ठरला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अशा प्रकारच्या सरावांचे महत्त्व अत्यंत वाढले आहे. यामुळे भविष्यातील आपत्तींवर अधिक कार्यक्षमतेने प्रतिक्रिया देणे शक्य होईल.