पाकिस्तानमधील ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईकनंतर भारतातील काही विमानतळांवरील नागरी उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. पुणे विमानतळावरून होणाऱ्या पाच मार्गांवरील उड्डाणे आज रद्द करण्यात आली आहेत. यामुळे अनेक प्रवासी प्रभावित झाले असून, त्यांना विमानतळ प्रशासनाने तात्काळ संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे. प्रवाशांना त्यांचे बुकिंग बदलण्यासाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रद्द केलेल्या उड्डाणांमध्ये पुणे-आमृतसर, पुणे-चंदीगड, पुणे-किशनगड, पुणे-राजकोट आणि पुणे-जोधपूर या मार्गांचा समावेश आहे. या बदलामुळे प्रवाशांना सुविधा मिळवण्यासाठी विमानतळ प्रशासन, विमान कंपन्या आणि संबंधित यंत्रणा सतत अपडेट देत आहेत. प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य दिली जात आहे आणि रद्द उड्डाणांचे कारण सुरक्षा संबंधित आहे.
प्रवाशांना त्यांच्या बुकिंगनुसार पर्यायी उड्डाणे उपलब्ध केली जात आहेत, तसेच पूर्ण तिकीट किमतीची परतफेडही केली जात आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले आहे. प्रवाशांनी विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.