परभणी : शहरातील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जलतरणीकेत ५५ वर्षीय असलम खान यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहमदिया मशीद परिसरातील रहिवासी असलेले खान हे दररोजप्रमाणे मित्रांसोबत पोहण्यासाठी आले होते. काही वेळानंतर ते जलतरणीकेत दिसेनासे झाल्याने शोध सुरु करण्यात आला. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर जलतरणीकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेच्या व्यवस्थांवर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. सदर जलतरणीका खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून चालवली जात असून, काही वर्षांपूर्वीही येथे अशीच एक प्राणघातक घटना घडली होती. तरीही योग्य ती सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली नसल्याचे यावरून स्पष्ट होते. सेफ जॅकेटच्या अनुपस्थितीमध्ये जलतरणीकेत उतरणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे, तसेच सेफ गार्डच्या अनुपस्थितीमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उन्हाळ्याच्या काळात जलतरणीका, तलाव आणि नद्यांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, अशा ठिकाणी पुरेशा सुरक्षेची व्यवस्था करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी ठरते. परंतु, परभणीतील या घटनेमुळे प्रशासन आणि ठेकेदार दोघांच्याही जबाबदारीची कसोटी लागली आहे. यानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार की नाही, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.