पाकिस्तानने गुरुवारी अपयशी ठरलेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर शुक्रवारी रात्री पुन्हा अमृतसर आणि जैसलमेरवर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी या ड्रोन हल्ल्यांना यशस्वीरित्या परतवून लावले. अमृतसरमधील सुवर्णमंदिराच्या संभाव्य धोक्यामुळे तातडीने ब्लॅकआऊट करण्यात आला, तर जैसलमेर आणि राजस्थानच्या बाडनेरमध्येही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विजपुरवठा खंडित करण्यात आला.
पाकिस्तानने लडाखपासून गुजरातपर्यंत स्वार्म ड्रोन्सच्या माध्यमातून ३६ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्वार्म ड्रोन्स हे एकत्रित झुंडीने हल्ला करणारे असून, त्यामध्ये विस्फोटक नसले तरी छर्रे टाकण्याची क्षमता असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता वाढते. त्यासोबतच तुर्कस्तानमधून आलेले मोठे ड्रोनही या कारवाईसाठी वापरण्यात आले होते. भारताने तातडीने चार ड्रोन्सचा वापर करून प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानची एक रडार प्रणाली उद्ध्वस्त केली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सीमावर्ती भागात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जम्मू, सांबा, पठाणकोट आणि पोखरणमध्ये संशयास्पद ड्रोन हालचालींवर तात्काळ कारवाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्याच्या माजी प्रमुखांशी बैठक घेत सुरक्षेसंदर्भात सल्लामसलत केली. पाकिस्तानने नागरी विमान सेवा बंद न करताच हवाई हल्ला केल्यामुळे भारताने अतिशय संयमाने आणि जबाबदारीने प्रत्युत्तर दिले.