भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी गडद झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या दोन्ही देशांमधील संबंध वाईट झाले असून, पाकिस्तानने आता 30 एप्रिल 2025 रोजी गिलगिट आणि स्कार्दू येणाऱ्या सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. एक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील भागांत उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय राष्ट्रीय हवाई सुरक्षा प्रोटोकॉलच्या आढाव्यानंतर घेण्यात आला. यासोबतच, पाकिस्तानने परदेशी उड्डाणांवर कडक देखरेख सुरू केली असून, विमानांची तपासणी करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाला दिले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा कारण 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला आहे, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चिघळले आहेत. भारताने पाकविरोधात कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली असून, यामध्ये सिंधू पाणी कराराचे निलंबन, अटारी बॉर्डर बंद करणे, आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित करणे यांचा समावेश आहे.
पाकिस्ताननेही भारताच्या या पावलांना उत्तर दिले असून, शिमला करार रद्द केला आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. या तणावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि कूटनीतिक संबंधांमध्ये आणखी संकटाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.