पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्यित कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानकडून प्रतिकार म्हणून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू करण्यात आली. गुरुवारी रात्री ८ ते शुक्रवारी सकाळपर्यंत पाकिस्तानने भारताच्या विविध भागांमध्ये ड्रोन घुसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाने या हल्ल्यांना वेळेत प्रत्युत्तर देत बहुतेक ड्रोन हवेतच निष्क्रिय केले.
कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याविषयी सविस्तर माहिती दिली. पाकिस्तानने तुर्की बनावटीच्या सुमारे ४०० ड्रोनचा वापर करत ३६ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला. हे हल्ले उरी, पूँच, राजोरी, उधमपूर, अकनूर या भागांमध्ये करण्यात आले. काही ड्रोन नागरी विमानांच्या मागे लपवत हवाई सीमेचं उल्लंघन करण्यात आलं. भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर ड्रोन पाडत पाकिस्तानच्या नियोजित कारवायांना अपयश दिले.
या हल्ल्यांमागील उद्देश भारताच्या एअर डिफेन्स यंत्रणेची ताकद जाणून घेण्याचा आणि गोपनीय माहिती मिळवण्याचा होता. भारतानेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानातील चार हवाई संरक्षण प्रणालींवर हल्ले करून एक यंत्रणा उद्धवस्त केली. या घडामोडींमुळे भारत-पाक संघर्षात ड्रोनचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, भविष्यातील युद्ध रणनीतीत याचे स्थान अधिक दृढ झाले आहे.