जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यानंतर भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सैन्य दलांना फ्री हँड देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सीमावर्ती गावांमध्ये युद्धजन्य स्थितीची शक्यता गडद झाली आहे.
सीमेपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असलेल्या उरी तालुक्यातील नांबला गावातील नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घरात बंकर बांधण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः साजीवार, ख्वाजा बांडी आणि हाजीपीर या पाकिस्तानी पोस्टजवळ असलेल्या भागांमध्ये ही हालचाल अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. हाजीपीर परिसरात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिक रात्रभर जागून काळजीत आहेत.
स्थानिक रहिवासी हाजी अब्दुल राशीद यांनी सांगितले की, “आम्ही 1947 पासून येथे राहतो, पण आता परिस्थिती गंभीर आहे. युद्ध होऊ नये अशीच आमची अपेक्षा आहे, कारण त्यात फक्त जवान नव्हे तर सामान्य नागरिकही बळी जातात.” पहलगाममधील हल्ला वेदनादायक असल्याचे सांगत त्यांनी शांतीची मागणी केली आहे. सध्या सीमेलगत असलेल्या भागात सामरिक सज्जतेसह नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी आहे.