पाकिस्तानी दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट विनय नरवालच्या पत्नी हिमांशी नरवाल यांनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. 'आज आपल्या सैन्याने आणि मोदी सरकारने दहशतवाद्यांना योग्य प्रतिसाद दिला आहे. आता पाकिस्तानलाही २६ भारतीय कुटुंबांनी सहन केलेल्या वेदनेची जाणीव झाली असेल,' असे हिमांशी म्हणाल्या.
२२ एप्रिलच्या त्या भीषण रात्रीच्या आठवणी सांगताना हिमांशी नरवाल म्हणाल्या, 'लग्नाला फक्त सहा दिवस झाले होते तेव्हा हा हल्ला झाला. माझ्या पतीने दहशतवाद्यांना दया याचण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी उत्तर दिले की हे प्रश्न मोदींकडे विचारा. आज सैन्य आणि सरकारने योग्य प्रतिसाद दिला आहे.' त्यांनी यावेळी हल्ल्यातील इतर सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केली.
हिमांशी नरवाल यांनी स्पष्ट केले की, 'ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे.' लेफ्टनंट विनय नरवाल हे कर्नालमधील रहिवासी होते. १६ एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले होते, तर केवळ ६ दिवसांनंतर २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. हिमांशी यांनी या संदर्भात सोशल मीडियावर झालेल्या अश्लील टिप्पण्यांवरही दुःख व्यक्त केले आहे.