भारतीय वायूदलाने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर लक्ष्य करत एअर स्ट्राईक केली. यामध्ये जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोएबा, आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनांच्या तळांचा समावेश होता. लष्कर ए तोएबाचे अनेक सदस्य ठार झाले असून, या कारवाईत सुमारे 30 दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतासोबत युद्धाची भाषा केली असून, सीमारेषेवर गोळीबारही सुरु आहे.
हल्ल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये लष्कर ए तोएबाचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याचे दिसून आले. यासोबतच पाकिस्तानी सैन्य आणि पोलिस अधिकारीही या सोहळ्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दहशतवाद्यांशी पाकिस्तानच्या थेट संबंधाचा पुरावा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मरीदके आणि बहावलपूर या भागातही भारतीय हवाई दलाने लक्ष्य केले.
या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्य ठार झाले असून त्याचा भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला आहे. असगरचा मुलगा हुजैफा आणि इतर सदस्यही या हल्ल्यात मारले गेले. या कारवाईमुळे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवरील आश्रयाला जागतिक स्तरावर प्रश्नचिन्ह लागले आहे.