नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमाच्या शूटिंगला मुंबईतील फिल्मसिटीमध्ये सुरुवात झाली आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामच्या भूमिकेत, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांच्या भूमिका साकारण्याचे शूट काही महिन्यांपासून सुरु आहे. साऊथ सुपरस्टार यशने रावणाची भूमिका साकारण्यास सुरुवात केली आहे. यशने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सिनेमाच्या शूटिंगला प्रारंभ केला आहे.
फिल्मसिटीमध्ये यशच्या रावणाच्या भूमिकेसाठी भव्य सेट उभारण्यात आले आहेत. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान, रावणाची लंका आणि अन्य महत्त्वाचे सीन फिल्मसिटीमध्ये शूट केले जात आहेत. यशच्या एन्ट्रीमुळे सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी सनीने आपल्या भूमिकेवर भाष्य करत 'हा सर्वात मोठा सिनेमा बनेल' असा विश्वास व्यक्त केला होता.
'रामायण' सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. पहिला भाग २०२६ मध्ये रिलीज होईल. लारा दत्ता कैकयीच्या भूमिकेत, आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अजिंक्य देव, आदिनाथ कोठारेसारखे अनेक कलाकार सिनेमा मध्ये भूमिका साकारणार आहेत. यशच्या रावणाच्या भूमिकेवर प्रेक्षकांचे लक्ष आहे, आणि या सिनेमामुळे मनोरंजन क्षेत्रात एक नवीन वळण येईल, असे मानले जात आहे.