मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर वेगवेगळ्या वाटेने गेलेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अलीकडच्या काळात झालेल्या वारंवार भेटींमुळे पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेने राजकीय चर्चेला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने चांगले यश मिळवले, तर शरद पवारांच्या गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. यामुळे दोन्ही बाजूंमधील कार्यकर्त्यांमध्ये एकसंघ होण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या पार्श्वभूमीवर स्पष्ट केलं की, पुढील निर्णय शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी सल्लामसलत करून घेतला जाईल. त्याआधी साहेबांची (शरद पवार) भेट घेणे आवश्यक आहे. ‘आमचे आठ खासदार उत्तम काम करत असून, कोणताही निर्णय एकत्र घेण्यात येईल,’ असंही त्यांनी सांगितलं. तसेच देश हे प्रथम असल्यामुळे तातडीचे निर्णय सध्या टाळण्यात येत आहेत.
दरम्यान, साताऱ्यातील कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. पवार कुटुंबातील नेत्यांमध्ये हास्यविनोद आणि आपुलकीने झालेली चर्चा पाहून, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांनीदेखील संभाव्य एकत्रिततेबाबत उघडपणे प्रतिक्रिया दिली असून, “विचारधारा एकच असल्यामुळे भविष्यकाळात गट एकत्र येतील, याचे आश्चर्य वाटणार नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले.