राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी म्हणजेच 'मिनी विधानसभे'साठी जोरदार तयारी करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी कंबर कसली असून, गुरुवारी (दि. २२ मे) साताऱ्यात एका मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. यानंतर ते निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथे होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर बुधवारी रात्रीच कराडमध्ये दाखल झाले. गुरुवारी सकाळी कराडमधील प्रीतिसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी जाऊन ते आदरांजली अर्पण करतील. यानंतर, ते विरंगुळा निवासस्थानी भेट देणार आहेत. सकाळी १० वाजता साताऱ्यातील पोवई नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील. यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यसभा खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात आधी तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे कराडमधील स्मृतिस्थळ हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहे. अजित पवार यांनी महायुतीत सहभागी झाल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी भेट देऊन अभिवादन केले होते, तर शरद पवार यांनीही याच ठिकाणाहून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात केली होती.