आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) तयारीला लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरु केली असून, गुरुवार, २२ मे रोजी साताऱ्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमाची सुरुवात कराडमधील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून होणार आहे. त्यानंतर, साताऱ्यातील पोवई नाक्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यसभा खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी महायुतीत सहभागी झाल्यावर सर्वप्रथम प्रीतिसंगमावर यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले होते. यानंतर शरद पवार यांनीही याच स्मृतिस्थळाला भेट देऊन आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली होती. त्यामुळे हे स्मृतिस्थळ राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रेरणास्थान मानले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात आधी तयारी सुरु केल्याचे दिसत आहे.