नागपूर : उपराजधानीत वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी मंगळवारी रात्री अचानक पारडी पोलिस ठाण्याची पाहणी केली. सायंकाळच्या गस्तीला टाळणाऱ्या पोलिस ठाणेदारांवर त्यांनी नाराजी व्यक्त करत फटकारले. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना ठाण्याच्या बाहेर जाऊन पायदळ गस्त, गुन्हेगार तपासणी आणि प्रतिबंधात्मक कारवाईचे स्पष्ट आदेश दिले.
पोलिस आयुक्तांनी स्वतः पारडी बाजार, हनुमान मंदिर चौक, प्रजापती नगर या गर्दीच्या भागात गस्त घालून सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रजापती मेट्रो स्टेशनजवळ काही तरुण टवाळखोरी करताना ताब्यात घेतले. तसेच सिम्बॉयसिस कॉलेज परिसरात पोहोचून तिथे गांजा, मद्यपान आणि टवाळखोरीसंदर्भातील तक्रारींची पाहणी केली. या ठिकाणी मद्यपान करताना काही तरुणांना अंधाऱ्या भागात आढळून आले. पोलिस आयुक्तांनी स्वतः त्यांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान पीयूष क्षीरसागर, आदित्य येनूरकर, संतोष राम, नमन त्यागी, आर्यन नेलवान आणि अंकित भोयर यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस आयुक्तांच्या या प्रत्यक्ष गस्तीमुळे नागपूर पोलिस प्रशासनाला अलर्ट मिळाला असून नियमित गस्तीसाठी अधिक सक्त निर्देश दिले गेले आहेत. शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे.