मुंबईत सोमवारी दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, लोकलसेवांवर त्याचा मोठा परिणाम जाणवला. विशेषतः दक्षिण मुंबई, कोस्टल रोड परिसर आणि मध्य रेल्वे मार्गावर लोकल सेवा दहा मिनिटांनी उशिराने धावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ठाणे, कल्याण, पनवेल आणि सीएसटीकडे जाणाऱ्या मार्गांवरही विलंब जाणवला आहे.
हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात तीव्र हवामान स्थितीचा इशारा दिला आहे. राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि पालघर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.
या अनपेक्षित हवामानामुळे पालघरच्या किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. डहाणू आणि पालघर परिसरात 40 ते 45 मच्छीमार बोटी वादळाच्या झळांत सापडून नुकसानग्रस्त झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा सुरू केला असून, नुकसानभरपाईसाठी अहवाल तयार केला जात आहे.