राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या, आता सर्वांचे लक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे लागले आहे. काही महिन्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असून, सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
जागावाटप आणि युतीतील मित्रपक्षांविरोधात आक्षेपार्ह विधानं टाळण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. मित्रपक्षांतील संबंध बिघडतील, असे वर्तन टाळावे, असेही ते म्हणाले. जागावाटपाचा निर्णय महायुतीतील प्रमुख नेते घेतील, त्यावर इतर नेत्यांनी भाष्य करू नये, असे एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवकांच्या बैठकीत सांगितले. मुंबईतील विविध राजकीय पक्षातून शिवसेनेत आलेल्या माजी नगरसेवकांशी संवाद साधताना त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.
महायुती सरकारने मागील अडीच वर्षात केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. मुंबई शहर आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावारुपाला येत आहे. नवीन गृहनिर्माण धोरणामुळे मुंबईबाहेर गेलेले नागरिक पुन्हा शहरात परत येऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.