मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रो 3 च्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत 9 मे 2025 पासून सुरू होणार आहे. या मार्गाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्री स्वतः मेट्रोने बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत प्रवास करतील. मेट्रोच्या या नवीन टप्प्यामुळे मुंबईकरांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो 3 च्या दुसऱ्या टप्प्याचा मार्ग बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत आहे. या मार्गावर सुमारे तीन ते चार दिवस सीएमआरएस पथकाने तपासणी केली होती. आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन मार्गामुळे मुंबईकरांचे प्रवासाचे वेळ वाचणार असून, कमी वेळेत बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत पोहोचता येणार आहे.
मेट्रो 3 च्या दुसऱ्या टप्प्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची सुविधा अधिक सुलभ होईल. हे टप्पे सुरु झाल्यामुळे मुंबईतील इतर भागांसह या मार्गाच्या आंतरजोडणाची क्षमता देखील सुधारली आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.