देशात सध्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत असून, काही भागांत उष्णतेची लाट तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचे प्रमाण दिसत आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यावर्षी उष्णतेची लाट तब्बल 50 दिवसांपेक्षा अधिक काळ सक्रिय होती, त्यामुळे बंगालच्या उपसागरातील आणि हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाले असून, यंदा मान्सून लवकरच अंदमानच्या सागरात 20 मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर 30 मे ते 1 जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सून लवकर दाखल होणे हे देशातील अनेक भागांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही पाण्याचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत लवकर येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो.
दरम्यान, महाराष्ट्रात हवामानात सातत्याने बदल होत असून, गेल्या 24 तासांमध्ये काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुढील 4 ते 5 दिवस हवामान विभागाने राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच मुंबई, ठाणे, पालघर येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही भागांत गारपीटही होण्याची शक्यता आहे.