मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी जाहीर केले की 29 ऑगस्ट 2025 पासून मुंबईत आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत. दोन वर्षांपासून संयम ठेवून सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला होता, मात्र मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आता निर्णायक टप्प्यावर आंदोलन नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
जरांगे-पाटील यांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप करत सांगितले की, मागील उपोषणानंतर सरकारने चार मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तीन महिने उलटल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता मागण्यांसाठी ताकदीनं उठाव करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. एक ऑगस्ट रोजी आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असून तयारी सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावरही टीका करत जरांगे यांनी शासनाला इशारा दिला की, मराठा समाजाचे हक्क देणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि ते रोखू नये. गॅझेटियर, केसेस व मराठा-कुणबी संबंधी अध्यादेश तत्काळ काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. “फक्त मला 28 ऑगस्टला मुंबईत सोडून जा, बाकी मी लढायला तयार आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी समाजाला आवाहन केले आहे.