महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या ४८ विभागांसाठी १०० दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम निश्चित केला होता. या १०० दिवसांच्या कालावधीत सर्व विभागांनी ९०२ धोरणात्मक उद्दिष्टं ठरवली होती. त्यात ७०६ उद्दिष्टं (७८%) पूर्ण झाली असून, बाकीच्या १९६ उद्दिष्टांचा पाठपुरावा सुरू आहे. या कामगिरीमध्ये १२ विभागांनी १००% उद्दिष्टे साध्य केली, तर १८ विभागांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे पूर्ण केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीचा गौरव करत संबंधित विभागांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की, या विभागांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असून, भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी दर्शवावी अशी अपेक्षा आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमाने सरकारच्या कार्यक्षमतेला एक नवा आयाम दिला असून, नागरिकांपर्यंत अनेक लोकाभिमुख उपक्रम पोहचवले गेले आहेत.
सर्व विभागांनी केलेल्या कामामुळे राज्यातील विकासाच्या वाटचालीत सकारात्मक बदल झाले आहेत. पण एक विभाग असे आहे ज्याने केवळ २४% गुण मिळवले, आणि त्यामुळे तो विभाग नापास झाला आहे. या धोरणात्मक कार्यक्रमाच्या यशामुळे महायुती सरकारला आणखी प्रगतीची दिशा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.