रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन 2025 निमित्त दोन वेगवेगळ्या मंत्र्यांकडून झेंडावंदन करण्यात आल्याने पालकमंत्रिपदावरील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत झेंडावंदन पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे, प्रशासनातील अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनीही रायगडमधील महाड शहरातील चांदे क्रीडांगणावर स्वतंत्रपणे झेंडावंदन केले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत विविध सरकारी खात्यांचे अधिकारीही उपस्थित होते. या घटनेनंतर दोन्ही मंत्र्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय चर्चांना जोर आला आहे.
यापूर्वी 18 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. त्यानुसार रायगडसाठी अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या घोषणेला शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून विरोध झाला होता. त्यामुळे हा निर्णय काही काळासाठी स्थगित करण्यात आला. यानंतरही रायगडमध्ये झेंडावंदनासारख्या कार्यक्रमांमध्ये दुहेरी उपस्थितीमुळे पालकमंत्रिपदाचा वाद अद्यापही सुटलेला नाही हे स्पष्ट झाले आहे.