महाराष्ट्राच्या स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन साजरा होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या प्रगतिपथावर अभिमान व्यक्त करत सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, मुंबई ही देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून महाराष्ट्र हे पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचे राज्य म्हणून ओळखले जाते. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
पवार यांनी आपल्या संदेशात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या महाराष्ट्रवीरांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानाचा गौरव करत सांगितले की, चव्हाण यांनी राज्याच्या भौतिक आणि सांस्कृतिक विकासाची पायाभरणी केली. त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनीही हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि जनतेने त्या प्रयत्नांना साथ दिली.
या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असून विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे, याकडेही पवारांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळणाऱ्या सहकार्यामुळे आणि राज्यातील जनतेच्या एकजुटीमुळे महाराष्ट्र अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.