मुंबई : महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या तीव्रतेसोबतच पाणीटंचाईची चिन्हेही दिसू लागली आहेत. राज्यातील 2,997 धरणांमध्ये सध्याचा पाणीसाठा फक्त 34.77% इतका कमी झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा जरी जास्त असला तरी उन्हाळ्यापूर्वीची ही स्थिती काळजीची आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी 28.32% पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्रादेशिक पातळीवर पाहता, पुणे विभागातील उजनी धरण मायनस पातळीवर पोहोचले असून खडकवासला धरणात 45.29% तर पानशेत धरणात 28.70% पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यात 34.48% तर विदर्भात 36.61% पाणीसाठा उपलब्ध आहे. कोकण विभागात सर्वात जास्त 42.20% पाणी धरणांमध्ये साठवले गेले आहे. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणात 56.28% पाणी असून ही एक चांगली बातमी आहे.
मराठवाड्यात पाणीटंचाईची लक्षणे आधीच दिसू लागली असून अनेक भागांमध्ये पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. जायकवाडी धरणात 875 दलघमी, माजलगाव धरणात 15.16% तर मांजरा धरणात 28% पाणी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर, उन्हाळ्यापूर्वीच पाणीव्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरले आहे.