चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आयपीएलमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने रायन रिकल्टनची विकेट घेत आयपीएलमध्ये १०० विकेट्स पूर्ण केल्या. कुलदीपने हा विक्रम ९७ सामन्यांमध्ये केला आहे. या कामगिरीमुळे त्याने माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांचा विक्रम मोडला असून, आयपीएलमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा चौथा फिरकी गोलंदाज ठरला आहे.
सर्वात जलद १०० विकेट्स घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांमध्ये अमित मिश्रा अव्वल स्थानी आहे. त्याने केवळ ८३ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला होता. वरुण चक्रवर्ती आणि युजवेंद्र चहल यांनीही अनुक्रमे ८३ आणि ८४ सामन्यांमध्ये १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक २०० विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. कुलदीप यादवने आता हरभजन सिंगला मागे टाकत या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात कुलदीपने २२ धावा देऊन १ विकेट घेतली. या हंगामात त्याने १३ सामन्यांमध्ये एकूण १३ विकेट्स घेतल्या आहेत. जरी त्याने विकेट्सचा दुहेरी आकडा पार केला असला, तरी त्याची कामगिरी अपेक्षेनुसार झालेली नाही, हे आकडेवारीवरून दिसून येते. तरीही, त्याने आयपीएलमध्ये महत्त्वपूर्ण विक्रम नोंदवला आहे.