कोल्हापुरातील केडीसीसी बँकेच्या वारणानगर शाखेत तब्बल 3 कोटी 22 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या बँकेचे अध्यक्ष आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ असले तरी, या प्रकरणात थेट त्यांचा सहभाग अद्याप निष्पन्न झालेला नाही. आर्थिक व्यवहार तपासणीदरम्यान बँकेतील अधिकाऱ्यांनी स्लीप, चेकवर बनावट सह्या करून तसेच बनावट खात्यांद्वारे रक्कमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक बाळासो बेलवळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून एकजण अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये माळेतील लिपिक मुकेश पाटील, आरळेतील कॅशियर शिवाजी पाटील, कोडोलीतील मिनाक्षी कांबळे आणि शरिफ मुल्ला यांचा समावेश आहे. तर शाखाधिकारी तानाजी पोवार यांचा शोध सुरू आहे.
या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी आता आर्थीक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणामुळे कोल्हापुरातील सहकारी बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून, बँकेतील आर्थिक सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.