कल्याण : टीटवाळा जवळील बल्याणी परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात आजीबरोबर वाद झाल्यानंतर तरुणी घर सोडून मैत्रिणीच्या घरी राहायला गेली होती. मात्र तिच्या मैत्रिणीने आणि तिच्या साथीदारांनी तिच्यावर नशेचे इंजेक्शन देऊन तीला कोंडून ठेवले आणि तिच्यावर एक महिनाभर बलात्कार केला. याबाबत पीडित तरुणीने टीटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींविरोधात तपास सुरू केला आहे.
तरुणीने आपल्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली असता, शबनम आणि जीनत या मैत्रिणींच्या साथीने तिला गाडीत बसवून नंतर एक अनोळखी ठिकाणी नेले आणि तिला नशेचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर या तरुणीवर अनेक दिवस अत्याचार करण्यात आले. बलात्काराच्या या प्रकरणात आरोप असलेल्या शबनम, जीनत, गुड्डू, गुलफाम, लियाकत, अली ईराणी यांसह अन्य आरोपींचा तपास सुरू आहे.
एक महिन्याच्या अत्याचारानंतर 3 मे रोजी पीडित तरुणीने खिडकीतून रडत स्वतःला बाहेर काढण्याची विनंती केली आणि तिला तिथून मुक्त करण्यात आले. पीडितेने तिच्या आजीच्या घरी धीर घेतला आणि त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत असून, न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.