जुन्नर तालुक्यातील जाधववाडी (बोरी बुद्रुक) येथून चंदन लाकडांची अवैध वाहतूक होण्याची माहिती वनविभागाच्या स्टॉप यांना मिळाली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने धाड टाकली. तपासणी दरम्यान, लहू सोमनाथ धुळे यांच्या गाडीत आठ गोणी चंदनाचे तुकडे, वजन काटा आणि इतर साहित्य सापडले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत एकूण १,५९,५०० रुपये इतकी आहे.
वनविभागाच्या पथकाने संशयित आरोपी लहु धुळे याची तपासणी केली असता, तो अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. वनविभागाने त्याचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना केली आहेत, आणि त्याला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती जुन्नरचे सहायक वनसंरक्षक अमृत शिंदे यांनी दिली. या धडक कारवाईमध्ये ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ, वनपाल, वनरक्षक आणि पोलिस यंत्रणा यांचा सहभाग होता.
सदर कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ हे करत आहेत. वनविभागाची ही कारवाई चंदन लाकडांच्या अवैध वाहतुकीवर कडेकोट नियंत्रण राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.