आयपीएल 2025 च्या 57 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळला. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरसाठी हा सामना अत्यंत निर्णायक होता कारण त्यांनी 11 पैकी फक्त 5 सामने जिंकले आहेत आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. चेन्नई सुपर किंग्ज मात्र आधीच प्लेऑफच्या शर्यतीबाहेर पडले असून, त्यांचे लक्ष्य सध्या गुणतालिकेत नीचांकी स्थान टाळणे आहे.
दोन्ही संघांनी प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले. कोलकाताने व्यंकटेश अय्यरच्या जागी मनीष पांडेला संधी दिली, तर चेन्नईकडून उर्विल पटेलने पदार्पण केले. धोनीने सॅम करन व शेख रशीदच्या जागी डेव्हॉन कॉनवे आणि उर्विलला संधी दिली. ईडन गार्डन्सवरची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल असली तरी, फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळते. हंगामातील सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.
कोलकाता व चेन्नई यांच्यातील इतिहास पाहता, चेन्नईचा पारडाच जड आहे. IPL इतिहासात झालेल्या 30 सामन्यांपैकी चेन्नईने 19 तर कोलकाताने 11 सामने जिंकले आहेत. ईडन गार्डन्सवर मात्र ही लढत अधिक अटीतटीची ठरली असून, येथे झालेल्या 10 सामन्यांपैकी चेन्नईने 6 आणि कोलकाताने 4 सामने जिंकले आहेत. यामुळे आजचा सामना केकेआरसाठी केवळ गुणांची शर्यत नसून, प्रतिष्ठेचाही प्रश्न ठरत आहे.