आधुनिक शेती पद्धतीचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे शेताच्या बांधावरून जाणारे शेत रस्ते 12 फूट रुंद असणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला असून, यामुळे शेतीत आधुनिकीकरण करणे अधिक सोपे होणार आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यांसारखी मोठी कृषी उपकरणे शेतातून सहज नेता येतील. अनेक वर्षांपासून शेत रस्त्यांवरून वाद सुरू आहेत, परंतु या निर्णयामुळे रस्त्यांची उपलब्धता वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतातील बांधापर्यंत पोहोचण्यासाठी यामुळे मदत होईल आणि वाहतूक सुलभ होईल.
शासन आदेशानुसार, या रस्त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर 90 दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे शेती संबंधित वाद कमी होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सहजपणे प्रवेश मिळू शकेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.