बारामती तालुक्यातील खांडज गावात ५८ वर्षीय वृद्धाचा निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीची ओळख मारुती साहेबराव रोमन (वय ५८) अशी पटली असून, माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ७ मे रोजी सकाळी खांडज शिवारातील विहिरीत अनोळखी मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास करताच मृताच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर मारहाणीचे जखमा आढळल्या. मृतदेह ओळखण्यासाठी त्याच्या भावाने पुष्टी दिली.
तपासादरम्यान, मारुती रोमन यांनी एका मजुरी करणाऱ्या तरुणाच्या आईकडे अश्लील मागणी केल्याचे समजले. ही बाब संबंधित तरुण नवनाथ घोगरे याला समजताच त्याने रागाच्या भरात आपला मित्र अनिल जाधव यांच्या मदतीने मारुती यांना निर्जनस्थळी नेले आणि डोक्यात दगड मारून हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी मृताचे कपडे जाळण्यात आले आणि मृतदेह ऊसाच्या शेतात लपवण्यात आला. नंतर हातपाय बांधून व साडीने मोठे दगड जोडून मृतदेह विहिरीत फेकण्यात आला.
या प्रकरणी नवनाथ घोगरे (२५, लोणावळा) आणि अनिल जाधव (३५, रायगड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आणि उपनिरीक्षक अमोल खटावकर यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत गुन्हेगारांना जेरबंद केले. या घटनेने खांडज परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.