कऱ्हाड येथे बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. हुंडाबंदी कायदा असूनही हुंड्यासाठी छळ होत असेल आणि त्यात वैष्णवीसारख्या महिलेचा जीव जात असेल, तर या विकृतीविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे. राज्य महिला आयोग कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणी कठोर भूमिका घेत आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी राज्य महिला आयोगाने तपास यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून काही जणांना ताब्यात घेतले आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणला जाईल. गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही, उलट ही विकृती ठेचून काढली जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र हगवणे हे पदाधिकारी नाहीत, परंतु कोणताही पक्ष असला तरी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, असे चाकणकर यांनी स्पष्ट केले. तसेच, राजेंद्र हगवणे यांच्या मुलाला पक्षातून निलंबित केले असल्याची माहिती त्यांनी दिली. महिला आयोगावर टीका करणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. महिला आयोगावर बोलणाऱ्या त्या कोण आहेत? असा सवाल त्यांनी रोहिणी खडसे यांचे नाव न घेता विचारला. त्या म्हणाल्या की, ज्या वडिलांच्या नावावर निवडून येतात, त्यांनी माझ्या कामावर टीका करू नये.
गेल्या साडेतीन वर्षात राज्य महिला आयोगाचे काम उत्तमरित्या सुरू आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांच्या बोलण्याला विशेष महत्त्व देण्याची गरज नाही. राज्य महिला आयोग पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि या प्रकरणातही कठोर कारवाई सुनिश्चित करेल, असे आश्वासन चाकणकर यांनी दिले.