पुण्यात वैष्णवी हगवणे या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नात 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देऊनही सासरच्या मंडळींचा छळ सुरुच होता, असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे अद्याप फरार आहे.
वैष्णवीच्या मामांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात अजित पवारांनी स्वतः हजर राहून हुंड्यात दिलेल्या फॉर्च्युनर गाडीची चावी नवऱ्या मुलाला दिली होती. त्यामुळे आता अजित पवारांनी या प्रकरणात लक्ष घालून वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. वैष्णवी आणि शशांक यांच्या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता. मात्र, वैष्णवीने हट्ट धरल्यामुळे कुटुंबीयांनी लग्न लावून दिले. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी वैष्णवीचा छळ सुरू केला. तिला मारहाणही करण्यात येत होती, असा आरोप आहे.
दरम्यान, 16 मे रोजी वैष्णवीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास करत आहेत. फरार असलेला मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग लागण्याची शक्यता आहे. वैष्णवीला न्याय मिळावा, यासाठी तिचे कुटुंबीय आग्रही आहेत.