डोंबिवली शहरातील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 तारखेला एका इमारतीत तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली आहे. मृत तरुणीचे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. त्यानंतर कल्याण क्राईम ब्रँचने अवघ्या 20 तासांत तिचा प्रियकर सुभाष भोईर याला अटक केली आहे.
सुभाष भोईर आणि मयत तरुणी तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. 22 तारखेला झालेल्या वादानंतर सुभाषने तरुणीचा गळा दाबून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना मृतदेह आढळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास अधिक तीव्र करण्यात आला.
कल्याण क्राईम ब्रँचने तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने सुभाष भोईरचा ठावठिकाणा शोधून काढला. तो कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी पुलाजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे सापळा रचून त्याला अटक केली. सुभाष पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कारवाई केली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, पुढील कार्यवाही प्रलंबित आहे.