दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये दिशाच्या वडिलांनी आत्महत्येची कल्पना फेटाळून, हत्या झाल्याचा आरोप केला आहे. सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने या याचिकेवर राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
तपासाअंती दिशा सालियनच्या मृत्यूचा अपघाती मृत्यू म्हणून नोंद झाला होता, परंतु आता कुटुंबीयांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारने याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. याचिकाकर्त्यांना तातडीने सुनावणी हवी असल्यास उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे दाद मागण्याची सूचना दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.
सतीश सालियान यांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती व इतर संबंधितांना आरोपी ठरवून अटक करण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवले आहे, विशेषत: सतीश सालियान यांच्या वकिलांसमोर उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या न्यायमूर्तींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल.