धुळे शहरातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड आढळल्याने खळबळ उडाली आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले असून, जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी ही रूम बुक केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 मे पासून शासकीय विश्रामगृहातील रूम नंबर 102 किशोर पाटील यांच्या नावे आरक्षित करण्यात आली होती. अनिल गोटे यांनी या खोलीत पाच कोटी रुपये असल्याची शक्यता वर्तवत कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाने रूम उघडली असता, त्यामध्ये 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड आढळून आली. या घटनेनंतर अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया देताना या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. हे आरोप निराधार असून विरोधकांनी सरकारला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना अर्जुन खोतकर म्हणाले की, अनिल गोटे यांनी केलेले आरोप पूर्णपणे तथ्यहीन आहेत. विरोधकांची ही जुनी सवय आहे. ते नेहमी अशा प्रकारे आरोप करून समितीला आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. किशोर पाटील यांच्या नावे रूम बुक केल्याच्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर सत्य समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.