संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात मुख्य आरोपीच्या अटकेनंतर राजीनामा दिलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र दिनी परळी तहसील कार्यालयात ध्वजवंदन सोहळ्यात सहभाग घेतला. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संतोष देशमुख हत्येवरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या घटनेच्या धक्कादायक फोटोंमुळे मुंडेंनी राजीनामा दिला होता.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतेमुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले मुंडे यांनी आज प्रथमच लोकांसमोर उपस्थिती दर्शवली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना मुंडे यांनी राज्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्यांच्या कार्याचे स्मरण केले. त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा गती मिळाल्याचे दिसत आहे.