बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावात 370 वर्षांपासून चालत आलेली पारंपरिक घटमांडणी यंदाही पार पडली असून, 1 मे रोजी सूर्योदयावेळी वर्षभरासाठीचे अंदाज जाहीर करण्यात आले. शेतकरी आणि स्थानिक नागरिक या मांडणीवर विश्वास ठेवत पीकपाण्याचे नियोजन करतात. यावर्षीच्या घटमांडणीत कापूस पिकावर रोगराईचा धोका जास्त असेल असे सूचित करण्यात आले आहे. तर इतर पिके – ज्वारी, तूर, गहू, हरभरा, मूग – सामान्य उत्पन्न देतील.
पावसाळ्याबाबत मांडणीत दिलेल्या अंदाजानुसार, जून महिन्यात सरासरी पाऊस, जुलै व सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस, तर ऑगस्टमध्ये हानीकारक अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. देशात आर्थिक टंचाई, नैसर्गिक आपत्ती, आणि युद्धजन्य परिस्थिती उद्भवू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतमालाला यंदा समाधानकारक भाव मिळणार नसल्याचेही संकेत देण्यात आले आहेत, त्यामुळे शेतीपूरक धोरणांचे नियोजन गरजेचे ठरणार आहे.
या परंपरेला शास्त्रीय आधार नसला तरी, स्थानिक शेतकरी घटमांडणीच्या अंदाजावर भरवसा ठेवतात. भेंडवळची मांडणी विशिष्ट पद्धतीने केली जाते, ज्यामध्ये 18 प्रकारची धान्ये, पाणीभरलेली घागर आणि पारंपरिक खाद्यपदार्थांची मांडणी करून अंदाज काढले जातात. विज्ञानयुगातही या परंपरेची सातत्याने जपणूक होत असून ग्रामीण भागातील जीवनशैलीतील ती एक महत्त्वाची सांस्कृतिक घटक बनली आहे.